प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोच्च गुण समजला जातो. जो व्यक्ती प्रामाणिकपणानं वागतो त्याचं समाजात आणि स्वत:च्या नजरेतही महत्त्वाचं स्थान प्राप्त करतो. प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत. असंच एक उदाहारण तामिळनाडूतील सफाई कर्मचाऱ्यानं केलेल्या कृतीतून समोर आलं आहे. तामिळनाडू प्रशासनातील एका महिला सफाई कर्मचाऱ्यानं कचरा गोळा करताना सापडलेलं १०० ग्रॅम वजनाचं अन् जवळपास साडेसात लाख रुपये किमतीचं सोन्याचं नाणं मालकाला परत केलं आहे. महिला सफाई कर्मचाऱ्याच्या या प्रामाणिकपणाची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि तिचं आज समाजात सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
एका कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या गणेश रमन या व्यक्तीनं आपल्या आजवरच्या कमाईतून १०० ग्रॅम वजनाचं एक सोन्याचं नाणं खरेदी केलं होतं. हे नाणं त्यानं एका गुलाबी रंगाच्या कागदात गुंडाळून स्वत:च्या बेडजवळ ठेवलं होतं. एकेदिवशी नाणं गहाळ झाल्याचं त्याला लक्षात आलं. त्यानं आपल्या पत्नीला याबाबत विचारणा केली असता तिनं कालच खोली स्वच्छ करुन सर्व केर काढला. त्यातच तो गुलाबी रंगाच्या कागदाची पुडीही टाकून दिल्याचं तिनं पतीला सांगितलं.
गणेश रमन यांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठलं आणि नाणं गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि ज्या दिवशी नाणं चुकून कचऱ्यात टाकण्यात आलं त्यादिवशी केर जमा करणारा कर्मचारी कोण होता याची माहिती घेण्यात आली. आश्चर्याचीबाब अशी की ज्या महिला कर्मचाऱ्याला सोन्याचं नाणं कचऱ्यात सापडलं होतं. तिनं ते तातडीनं तिच्या मॅनेजरच्या मदतीनं प्रशासनाकडे सोपवलं होतं.
संबंधित महिला सफाई कर्मचाऱ्याचं नाव मेरी असं असून कचऱ्याचं वर्गीकरण करत असताना तिला हे सोन्याचं नाणं सापडलं होतं. तिनं ते सापडताच क्षणाचाही विलंब न करता आपल्या मॅनेजरला याची कल्पना दिली होती आणि ते प्रशासनाकडे सोपवलं होतं. दुसऱ्या दिवशी गणेश रमन आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलं व नाणं परत देण्यात आलं. गणेश रमन आणि प्रशासनानंही मेरी यांच्या प्रामाणिकतेचं कौतुक केलं व तिचे आभार मानले. प्रशासनाकडूनही मेरी यांचा सत्कार करण्यात आला.