Tata Electronics Plant : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली. स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे प्लांटचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्लांटच्या सेलफोन उत्पादन विभागात ही आग लागली. त्यानंतर प्लांटमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. कारखान्यात आग लागली तेव्हा सुमारे १,५०० कामगार कामावर होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोश्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी १०० हून अधिक पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोबाईल फोन ॲक्सेसरीजच्या पेंटिंग युनिटमध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. टीईपीएल कंपनी ही आयफोनसाठी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज बनवते. या कंपनीत सुमारे ४,५०० कर्मचारी काम करतात. यामध्ये बहुतांश महिला आहेत. आगीनंतर युनिटमधून काळ्या धुराचे ढग निघत होते. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कृष्णगिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी थनागदुराई यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा मोबाईल पॅनल पेंटिंग युनिटमध्ये काही कर्मचारी काम करत होते. या युनिटमध्ये रसायनांचा साठाही होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली, त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. गुदमरल्यामुळे तीन कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीनंतर घटनास्थळी सर्वत्र काळा धूर पसरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीची जागा तात्काळ रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आग विझवण्यासाठी होसूर, कृष्णगिरी आणि जवळपासच्या अनेक अग्निशमन केंद्रातून सात अग्निशमन गाड्या मागवण्यात आल्या आहेत. आम्ही या भागात १०० हून अधिक पोलिस तैनात केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयफोनसाठी अनेक उपकरणे तयार करणारी ही कंपनी ५०० एकरांवर पसरलेली आहे.