मदुराई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तर तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तामिळनाडू सरकारमधील मंत्री सेल्लुर राजू यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता तो पूर्णपणे बरे असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवारी ते मदुराईला परतले. मात्र, कोरोनामुक्त झाल्यामुळे AIADMK च्या कार्यकर्त्यांनी सेल्लुर राजू यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविण्यात आला.
वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, शेकडो कार्यकर्त्यांनी सेल्लुर राजू यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी सेल्लूर राजू हे आपल्या गाडीत बसून हात जोडून कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत. अनेक पोलीस सुद्धा तेथे दिसतात. मात्र, त्यांच्या स्वागतादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडू सरकारने राज्यात लागू असलेला लॉकडाऊन कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये आणखी सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये खासगी आस्थापनांच्या कार्यालयात आणखी कर्मचार्यांना येण्याची आणि हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात सर्व रविवारी लागू असलेला संपूर्ण लॉकडाऊन वाढवून ऑगस्टपर्यंत वाढवताना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी म्हणाले की, 2, 9, 16, 23 आणि 30 ऑगस्टला कडक नियम लागू असतील. तसेच, सोशल डिस्ंटसिंग आणि मास्क वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन राज्यात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक, शॉपिंग मॉल्स, थिएटर, बार आणि सर्व प्रकारच्या राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांवर निर्बंध कायम राहतील, असे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सांगितले.