नागरकोइल : भाषा व संस्कृतीविरोधी शक्तींना आणि एक संस्कृती, एक राष्ट्र व एक इतिहास ही संकल्पना समोर आणणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी तामिळनाडूने भारताला दिशा दाखवायला हवी, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले.
राहुल गांधी हे राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, तामिळनाडूत तामिळ लोकांशिवाय अन्य कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. २३४ सदस्य असलेल्या विधानसभेसाठी राज्यात ६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेस द्रमुकसोबत आघाडी करून निवडणूक लढत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, या निवडणुकीतूनही हेच दिसून येईल की, तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीच येथे मुख्यमंत्री बनू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झुकणारे राज्याचे मुख्यमंत्री (के. पलानीस्वामी) असे करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांच्या पुढे झुकायला हवे. आरएसएस आणि मोदी हे तामिळ भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करतात. त्यामुळे लोकांनी त्यांना येथे पाय पसरू देऊ नयेत. मोदी हे एक संस्कृती, एक राष्ट्र, एक इतिहास, एक नेताच्या गोष्टी करतात. तामिळ भाषा भारतीय नाही का, बांगला भारतीय भाषा नाही का, तामिळ संस्कृती भारतीय संस्कृती नाही का, असा सवाल करून ते म्हणाले की, या निवडणुकीत हीच लढाई लढली जाणार आहे. ज्याप्रमाणे भारताच्या सर्व भाषा आणि धर्मांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे तामिळ भाषा, संस्कृती व इतिहास यांचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे.
मंदिरात पूजा करून प्रियांका गांधींचा आसाम दौरा सुरू गुवाहाटी : गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात पूजा करून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारपासून आसामच्या दोन दिवसीय दौऱ्याला प्रारंभ केला. राज्यात १२६ सदस्यीय विधानसभेसाठी २७ मार्च, १ आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. प्रियांका गांधी प्रथम जलुकबारी भागात थांबल्या. येथे काँग्रेस समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नीलाचल हिल्सस्थित शक्तिपीठाकडे त्या रवाना झाल्या. प्रियांका गांधी येथे लाल पोशाखात दिसून आल्या. हा रंग शक्तिचे प्रतीक मानला जातो. त्या म्हणाल्या की, मी कुटुंब आणि सर्वात अधिक आसामच्या लोकांसाठी प्रार्थना केली.