वेल्लोर : सिनेमाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने स्वत:च्या वडिलांना पेटविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुलगा अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिथ कुमार याचे 45 वर्षीय वडील पांडियन हे वेल्लोरमध्ये रोजंदारीवर काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी सकाळी पांडियन येथील एका बंद दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी अजिथ कुमारने त्यांना उठवले आणि सांगितले की, 'विश्वासम' हा चित्रपट पाहण्यासाठी जायचे आहे. यासाठी पैसे द्या. मात्र, पांडियन यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाने अजिथ कुमार याने घरातून रॉकेलची बाटली आणली. त्यानंतर पांडियन यांच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावून पळ काढला.
पांडियन आगीमुळे मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मजुरांनी पांडियन यांना वेल्लोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले. सध्या पांडियन यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करत आहेत.