चेन्नई : तामिळनाडूमधीलमंदिरांमध्ये तीन महिलांना लवकरच सहायक पुजारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. कृष्णावेणी, एस राम्या आणि एन रंजिता असे या तीन महिला पुजारी असून त्यांना सरकारद्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागांतर्गत (Hindu Religious and Charitable Endowments Department) मंदिराचे पुजारी होण्यासाठी या महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान, हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागाद्वारे सहा पुरोहित प्रशिक्षण शाळा चालविल्या जातात. या ठिकाणी सर्व समुदायातील लोक पुजारी बनण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी महिलांनी प्रथमच प्रवेश घेतला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, द्रविडीयन सरकारच्या मॉडेलने हे अशा वेळी शक्य केले, जेव्हा महिलांना अपवित्र मानले जात होते आणि त्यांना स्त्री देवतांच्या मंदिरांनाही जाण्याची परवानगी नव्हती. यासंदर्भात एमके स्टॅलिन यांनी ट्विट केले की, "महिलांची वैमानिक आणि अंतराळवीर म्हणून कामगिरी असूनही, त्यांना मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पवित्र भूमिकेपासून रोखण्यात आले. स्त्री देवतांच्या मंदिरातही त्यांना अपवित्र मानले जात असे. पण बदल शेवटी आलाच! तामिळनाडूमध्ये आपल्या द्रविड मॉडेल सरकारनेही विविध जातीतील लोकांना पुजारी म्हणून नेमून थनाथाई पेरियार यांच्या हृदयातील हा काटा काढला आहे. सर्वसमावेशकता आणि समानतेचे नवे युग घेऊन स्त्रिया देखील आता गर्भगृहात पाऊल ठेवत आहेत."
रिपोर्ट्सनुसार, एस राम्या या कुड्डालोरमधून एमएससी पदवीधर आहे. त्यांनी मुलाखतींमध्ये म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीला प्रशिक्षण त्यांच्यासाठी कठीण होते. तर गणित विषयात पदवीधर असलेल्या कृष्णावेणी यांनी सांगितले की, त्यांना देव आणि लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे त्यांनी हे प्रशिक्षण निवडले. राम्या आणि कृष्णावेणी या नातेवाईक आहेत आणि दोघींनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे एक वर्षाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते, ज्यासाठी त्यांना 3,000 रुपयांचा स्टायपेंड मिळाला होता. याशिवाय, रंजिता या बीएस्सी पदवीधर आहे, त्यांनी आपल्या आवडीने हे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ही बातमी अशावेळी आली आहे, ज्यावेळी तामिळनाडूचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माविरोधात वक्तव्य करून गंभीर अडचणीत सापडले आहेत. एकीकडे भाजपसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याबद्दल देशातील काही ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.