ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि.5 - अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती होणार हे आता नक्की झालं आहे. रविवारी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांची विधीमंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली आहे. लवकरच त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
रविवारी AIADMK ने पोयस गार्डन येथे अंतर्गत बैठक बोलावली होती, यामध्ये शशिकला यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत निर्णय़ घेण्यात आला. बैठकीत विधीमंडळाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली, मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनीच बैठकीत याबाबत प्रस्ताव ठेवला होता. यासोबत पनीरसेल्वम यांनीही राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे माजी मंत्री के. ए. सेनगोट्टियान, एस. गोकुल इंदिरा व बी. व्ही. रामना यांच्यावर पक्षाच्या सचिवपदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवक आघाडीच्या सचिवाची उचलबांगडी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चार मंत्र्यांनी शशिकला यांना मुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती. शशिकला (६२) या जयललिता यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. तीन दशकांपासून त्या अण्णाद्रमुकमध्ये सक्रिय आहेत.
Tamil Nadu: Sasikala Natarajan reaches AIADMK HQ in Chennai, she is all set to be Tamil Nadu CM says AIADMK pic.twitter.com/N0pbXHzRG8— ANI (@ANI_news) February 5, 2017