ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27- तामिळनाडूचं नेतृत्व करण्यासाठी तामिळ व्यक्ती का हवा ? असं अभिनेते कमल हसन म्हणाले आहेत. तामिळनाडूचं नेतृत्व तमिळ व्यक्तीने करावं का? असा प्रश्न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्ती आपल्याकडे नेते होऊन गेले आहेत, ते तामिळीयन होते का ? त्यांना लोकांनी स्विकारलं नाही का ? असं उत्तर त्यांनी दिलं आहे. दक्षिणेतील लोक अजूनसुद्धा या नेत्यांची नाव आपल्या मुलांना देतात", असही कमल हसन म्हणाले आहेत. नुकत्याच झालेल्या तामिळ बीग बॉसच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते.
तामिळ बीग बॉसचं कमल हसन सूत्रसंचलन करणार आहेत.
अभिनेते रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरही कमल हसन यांनी उत्तर दिलं आहे. रजनीकांत काही चुकीचं किंवा नविन बोलले नाहीत, असं कमल हसन म्हणाले आहेत. "कुठलाही साधारण व्यक्ती राजकारणात येण्याचा कधीच विचार करणार नाही, राजकारण हे पैसा कमविण्याचं माध्यम नाही आहे, हे लोकांना कळायला हवं. तामिळनाडूच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता कुठल्याही सामान्य माणसाने किंवा कलाकाराने राजकारणात उडी घेण्याचा विचार करू नये",अशी प्रतिक्रिया कमल हसन यांनी दिली आहे.
तुम्ही राजकारणात जाणार का असा प्रश्न कमल हसन यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर, "वयाच्या 21व्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा मतदान केलं तेव्हाच राजकारणात प्रवेश केला होता. पण कोणी सत्तेत यावं किंवा येऊ नये, यासाठी कधीच वाद घातला नाही". . असं उत्तर कमल हसन यांनी दिलं आहे.