नवी दिल्ली : आपण यापुढे आता लेखन करणार नाही कारण लेखक पेरुमल मुरुगन यांचा मृत्यू झाला आहे, अशी स्वत:च्याच निधनाची नोंद सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर टाकून विख्यात तामिळ लेखक पी. मुरुगन यांनी त्यांच्या वाचकांसह सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे. त्यांच्यावर असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचीही नोंद त्यांनी फेसबुकवर केल्याचे एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.पी. मुरुगन हे काही ईश्वर नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाले असून त्यांना यापुढे काही लिहिता येणार नाही. ते केवळ शिक्षक म्हणून जिवंत असतील असेही मुरुगन यांनी या पोस्टमध्ये पुढे नोंदविले आहे. वाचकांनी व चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादाकरिता त्यांनी त्या सर्वांचे आभार मानले असून, माझी पुस्तके मला परत करा किंवा जाळून टाका अशीही निरवानिरवीची भाषा केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनाही बाजारातून ती परत घेण्याची व त्याची विक्री बंद करण्याची विनंती त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री टाकलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी, जात, धर्म व राजकीय पक्षांसोबत जुळलेल्या संघटनांनी आपल्या विरोधात सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे असे सुचविले आहे. त्यांच्या माथोरुभागन या पुस्तकाबाबत वाद निर्माण झाला होता.
तामिळ लेखकाने दिली स्वनिधनाची बातमी
By admin | Published: January 15, 2015 6:21 AM