नवी दिल्ली, दि. 1 - भारतीय जनता पार्टीचे पुढील मिशन आता ''दक्षिण भारत'' असल्याचे दिसत आहे. त्यानुसार भाजपाच्या प्रसार तंत्रानं तामिळनाडूकडे कूचही केली आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय राजकारण तशी चर्चादेखील सुरू झाली आहे. यादरम्यान तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेता व केंद्रीय मंत्री यासंबंधी AIADMK नेत्यांसोबत बोलणी करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, AIADMK ला एनडीएचा हिस्सा बनवण्याचा विचार सुरू आहे. दक्षिण भारतात भाजपा सत्तेपासून दूर आहे. उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकवल्यानंतर आता भाजपाचे पुढील टार्गेट आहे ''दक्षिण भारत''. अशात तामिळनाडू हा भाजपासाठी सर्वाधिक चांगला व सोयीस्कर पर्याय असल्याचे मानले जाते आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील सत्तेत संघर्ष सुरू आहे. त्यांचा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. त्यांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जातील,अशी शक्यता होती. मात्र बेहिशेबी मालमत्ताप्रकरणा शशिकला यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ई. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवण्यात आले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी आधीच बंड पुकारले आहे.
अशा परिस्थितीत भाजपा AIADMKच्या माध्यमातून दक्षिण भारतात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणामुळेदेखील रखडला गेला असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात AIADMK चाही समावेश होण्याची शक्यत वर्तवली जात आहे.