चेन्नई : कृष्णगिरी व वेल्लोर या जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्गांवरील इंग्रजी भाषेतील दिशादर्शक बोर्ड काढून तिथे हिंदीतील बोर्ड लावण्यात आल्याने तामिळनाडूमध्ये बऱ्याच वर्षांनी हिंदीविरोधी आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तामिळी जनतेने सातत्याने हिंदीच्या जबरदस्तीला विरोध केला आहे. त्या प्रश्नावरून तिथे अनेकदा आंदोलनेही झाली आहेत.द्रमुकचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन यांनी हिंदीतील दिशादर्शक बोर्डांना जोरदार आक्षेप घेतला आहे. बोर्डावरून इंग्रजीतील नावे काढणे आम्हाला मान्य नसून, केंद्र सरकार मागील दाराने तामिळनाडूवर हिंदी लादत आहे, असा आरोप त्यांनी केला असून, हे तामिळी जनता खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हिंदी बोर्डच्या विरोधात द्रमुक मोठे आंदोलन उभारेल, असे ते म्हणाले.एमडीएमकेचे प्रमुख व्ही. गोपालस्वामी उर्फ वायको यांनी तसेच पीएमकेचे नेते एस. रामदास यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. आमच्यावर हिंदी लादण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, ही जबरदस्ती खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी वा सत्ताधारी अण्णा द्रमुकने याबाबत अद्याप काहीही बोलणे टाळले आहे. मात्र तो पक्षही हिंदीविरोधी भूमिका घेईल, असे दिसते. (वृत्तसंस्था)
रस्त्यांवरील हिंदी बोर्डांमुळे तामिळनाडूमध्ये संताप
By admin | Published: April 02, 2017 12:50 AM