नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करणं एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडणार आहे. ओविया हेलेनच्या (Oviya Helen) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी ओविया हेलेनने नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. पण आता ओवियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तामिळनाडू भाजपाचे राज्य सचिव डी अॅलेक्सिस सुधाकर (D Alexis Sudhakar) यांनी ओवियाविरूद्ध पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या अभिनेत्रीविरोधात कारवाई करावी अशी मागणी सुधाकर यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी ओविया हेलेन यांच्या ट्वीटमागील हेतूचा पोलिसांनी शोध घ्यावा असंही म्हटलं आहे. भाजपाने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा दावा केला आहे.
ओविया हेलेनच्या या ट्वीटनंतर बर्याच लोकांनी अनेक ग्रुपच्या माध्यमातून सार्वजानिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची दावाही सुधाकर यांनी केला आहे. मोदींविरोधात ट्विट केल्यानंतर आता तिची जोरदार चर्चा रंगली आहे. नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापूर्वी तिने एक ट्विट केलं असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ओविया हेलेनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 13 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विट केलं होतं. यामध्ये GoBackModi असा हॅशटॅग लिहिला होता.
नरेंद्र मोदी विविध विकास कामांच्या संबंधित योजनांच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूमध्ये आले होते. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओविया हेलेनने पंतप्रधानांच्या भेटीचा निषेध करण्यासाठी ट्विटरवर #GoBackModi असं लिहिलं होतं. यानंतर आता तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तमिळ बिग बॉसमध्ये आल्यानंतर ओविया हेलेन प्रामुख्याने चर्चेत आली होती. तिने काही तमिळ, मल्ल्याळम आणि कन्नड चित्रपटांत देखील काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.