मदुराई - तामिळनाडूमधील एका वृद्ध दाम्पत्याने घरी चोरी करायला आलेल्या चोरांची चांगलीच धुलाई केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. चोरांना घाबरून न जाता आजी-आजोबांनी चपला, खुर्च्या तसेच मिळेल त्या वस्तूने चोरांना खूप चोप दिला. या घटनेनंतर दाम्पत्याला घाबरून चोरटे पळून गेले. घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली होती. तसेच याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. चोरट्यांना चोपणाऱ्या या धाडसी आजी-आजोबांचा शौर्य पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे.
तामिळनाडू सरकारने शौर्य पुरस्कारने या दाम्पत्याचा सन्मान केला आहे. सुवर्ण पदक आणि दोन लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पी शानमुगवेलु आणि त्यांच्या पत्नी सेंतथामराई यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) पुरस्काराने सन्मान केला आहे.
तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका दाम्पत्याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी प्रवेश केला. 75 वर्षीय आजोबा रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेर बसले होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी आवाज ऐकून 68 वर्षी आजी घरातून बाहेर आल्या आणि त्यांनी पतीला वाचवण्यासाठी चोरट्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरांच्या हातात शस्त्र असलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. मात्र त्या शस्त्रांना दाम्पत्य घाबरलं नाही आणि त्यांनी चोरांना चोख प्रत्युत्तर देऊन पळून लावलं.
आजी-आजोबांनी चपला, प्लास्टिक खुर्च्या, टेबल तसेच मिळेल त्या वस्तूने घराबाहेर आलेल्या दोन चोरट्यांना चोप दिला. चोरट्यांनी देखील त्याच्या हातातील धारदार शस्त्रांचा दाम्पत्याला धाक दाखवला. तसेच मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही वृद्ध दाम्पत्य घाबरले नाही. त्यांनी चोरांचा सामना केला. चोरांची धुलाई करताना प्लास्टिकची खुर्ची आणि स्टूल देखील तूटले आहेत. दाम्पत्याचा रुद्रावतार पाहून चोरांनीच हार मानली आणि तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना घराबाहेरील कॅमेऱ्यात कैद झाली. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून आजी-आजोबांच्या धाडसाचं कौतुक केलं गेलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या दाम्पत्याचं कौतुक केलं. या घटनेचा व्हिडीओ ट्विट करून braaaaavoooooooo !!!!! असं म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं.