मदुराई - तुतिकोरिनमधील स्टरलाइट कंपनीच्या विरोधात मंगळवारी (22 मे) झालेल्या निदर्शनांत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 13वर गेली असून, परिसरात आजही प्रचंड तणाव आहे. गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयाची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता आहे. यासाठी तुतिकोरिनमधील परिस्थिती नियंत्रणात येण्याची प्रतीक्षा सध्या केली जात आहे. राहुल गांधी यांचा तामिळनाडू दौऱ्याचा कार्यक्रम एक-दोन दिवसांत निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या निर्दशनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्नदेखील राहुल गांधी यानी उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी येथील नागरिकांशी संवाद साधू इच्छित आहेत. मात्र आता सद्यपरिस्थितीमुळे नागरिकांसोबत संवाद साधणं अशक्य आहे. शिवाय, परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तुतिकोरिनमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पहिल्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन जखमींचा मृत्यू झाला. बुधवारीदेखील स्टरलाइट स्टरलाइट कंपनीविरोधात निदर्शन करणाऱ्या लोकांनी हिंसाचार करत पोलिसांच्याही कित्येक वाहनांची जाळपोळ केली. अद्यापही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. यामुळे राहुल गांधी येथील हिंसाचार थांबवण्याची प्रतीक्षा करत आहेत.
दुसरीकडे, तुतिकोरिन परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथील सर्व रुग्णालयांत जखमींची गर्दी झाली आहे. या कंपनीच्या कॉपर प्लांट योजनेला प्रस्तावाला मद्रास उच्च न्यायालयानं बुधवारी (23 मे) स्थगिती दिली. तसंच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. पोलिसांनी पोटाच्या वरच गोळ्या माकल्याचा आरोप करण्यात आला असून, याची तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारनंही या गोळीबाराची तसंच तेथील स्थितीची माहिती मागवली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही या प्रकाराची चौकशी करणार आहे.
तुतिकोरिनमध्ये निदर्शकांवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? तुतिकोरिनचे नवे जिल्हाधिकारी संदीप नंदूरी यांनी सांगितले की, गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला?, याचा तपशिल यासंबंधी स्थापन करण्यात आलेला आयोग देऊ शकतो. निदर्शनादरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या, जखमी झालेल्या आणि सोबत अटक करण्यात आलेल्या लोकांची एक यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.