बंगळूरु, दि. 16 - तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते आज बंगळुरुमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उदघाटन झाले. या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाष्टा 5 रुपयात तर, दुपार आणि रात्रीचे जेवण 10 रुपयात उपलब्ध होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बजेट सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन सुरु करण्याची घोषणा केली होती.
कर्नाटकाचे वित्तखाते सिध्दरामय्या यांच्याकडेच असून, त्यांनी बजेट वाचनामध्ये नम्मा कॅन्टीन असा उल्लेख केला होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर 'इंदिरा कॅन्टीन' असे या योजनेचे नामकरण करण्यात आले. अम्मा कॅन्टीन योजना तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय ठरली. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सलग दुस-यांदा सत्तेत पोहचवण्यात ही योजनी महत्वपूर्ण ठरली होती.
आणखी वाचा कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास
बलवान देशासाठी हवी ‘सप्तमुक्ती’
त्यामुळेच कर्नाटकात काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणा-या सिध्दरामय्या यांनी कॅन्टीन योजनेचा आधार घेतला आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते इंदिरा कॅन्टीनचे उदघाटन झाल्यानंतर ते इथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. 12 ऑगस्टला रायचूर येथे सभेला संबोधित केल्यानंतर राहुल गांधी दुस-यांदा कर्नाटकात येत आहेत. पुढच्यावर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. मागच्या आठवडयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा कर्नाटकाचा दौरा केला होता.
बंगळुरुतील 15 ते 20 लाख लोकांना इंदिरा कॅन्टीन योजनेचा फायदा होईल असा सिध्दरामय्या यांना विश्वास आहे. फक्त बंगळुरुतील लोकांनाच नव्हे तर, नोकरीच्या शोधात इथे येणारे, पर्यटक यांना सुद्धा स्वस्तात दर्जेदार अन्नाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
उत्तरप्रदेशात योगींनी सुरु केली अन्नपूर्ण योजना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एप्रिलमध्ये अन्नपूर्णा योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेने त्याचे स्वागत केले. पण फार कमी जणांना माहिती असेल कि, योगी 2008 पासून गोरखपूरमध्ये अशा प्रकारची योजना राबवत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्याआधीच गोरखपूरचे खासदार असतानाच योगींनी अन्नपूर्णा भोजना सेवा योजना सुरु केली होती. या योजनेत गरीबांना फक्त 10 रुपयात जेवणाची थाळी मिळते. यामध्ये दोन चपाती, डाळ, 150 ग्रॅम भात आणि दोन भाज्या मिळतात.