Udayanidhi Stalin: सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे मत द्रमुकच्या युथ विंगचे सचिव आणि तामिळनाडूचे युवा कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले. सनातन धर्माची तुलना त्यांनी कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यूशी केली. अशा गोष्टींना विरोध करू नका, तर नष्ट करा, असे आवाहनही त्यांनी केले. उदयनिधी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना उदयनिधी यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी यांच्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात देशातील २६२ नामवंतांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उदयनिधी आपल्या विधानावर ठाम आहेत. तर, भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उदयनिधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर
भाजप नेत्यांनी माझ्या विधानाचा योग्य प्रकारे अर्थ घेतला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी मणिपूर हिंसाचार तसेच भ्रष्टाचारापासून लक्ष विचलित करण्यासाठी सनातन धर्माचा वापर करत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली आहेत. तुम्ही आमच्या कल्याणासाठी नेमके काय केले, असा प्रश्न भाजप सरकारविरोधात संपूर्ण देश एकजुटीने करत आहे. पंतप्रधान मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका उदयनिधी यांनी केली.
दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री फेक न्यूजच्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मंत्री पदावर असताना त्यांनी माझी बदनामी केली, म्हणून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल केले पाहिजेत. पण मला माहिती आहे की, अशा प्रकारे व्यक्त होणे ही त्यांची अस्तित्व टिकवण्याची पद्धत आहे. त्यांना जगण्याचा दुसरा मार्ग माहिती नाही, म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले.