चेन्नई - कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या.
तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे. येथील निवडणुकीत एडीएमने भाजपासोबत आघाडी केली असून डीएमके स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. सुरुवातीला हाती आलेल्या आकडेवाडीनुसार एम. के. स्टॅलीन यांच्या डीएमकेने 131 जागांवर आघाडी घेतली असून एआयएडीएमकेला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपाला अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही. तर, मक्कल निधी मय्यम पक्षाला केवळ पक्षप्रमुख असलेल्या कोईम्बतूर येथील जागेवरच आघाडी घेता आली आहे.
कोईम्बतूरमधील सर्वात लक्ष लागलेल्या उमेदवारांच्या निकालात मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख अभिनेता कमल हसन यांनी मोठी आघाडी घेतल्याचे समजते. कमल हसन यांनी काँग्रेसच्या मयुरा जयकुमार यांना मागे टाकले आहे.