चेन्नई - महिलांना मंदिर प्रवेश आणि अन्य कारणावरुन दक्षिणेकडे कायम वादंग सुरु असतो. पूर्वापार चालत असलेल्या रुढी परंपरांबाबत आता हळूहळू समाजात जागरुकता निर्माण होत आहे. आधीच्या काळात लोकं एकमेकांकडे जातीच्या नजरेने पाहायचे. क्षुद्र लोकांना समाजातील मान्यवर आसपासही फिरकून द्यायचे नाहीत. मात्र आधुनिक भारतात आजही अनेकठिकाणी जाती व्यवस्थेचा समाजावर किती पगडा आहे ते दिसून येते. कनिष्ठ जातीतील लोकांना हीन वागणूक देत त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते.
अलीकडेच तामिळनाडूतील ममल्लापुरम येथे राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी स्वत:ला आणि कुटुंबीयांना कांचीपूरमच्या मंदिरात अन्नदान कार्यक्रमावेळी अपमानित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या महिलेला मंदिरात जेवणापासून रोखण्यात आले. इतकचं नाही तर महिलेला मारहाण झाली कारण ती नरिकुराव समुदायातून होती.
अनुसुचित जातीच्या महिलेला मंदिरात जेवण दिलं नाही
महिलेचा आरोप होता की, मी माझ्या कुटुंबीयांसह मंदिरात गेली होती. तेव्हा मला सगळ्यात शेवटी बसवण्यात आले. जेवण वाढण्यापूर्वी मंदिराचे काही कार्यकर्ते आले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. या महिलेने कार्यकर्त्यांना विरोध केल्यावर महिलेला मारहाण करण्यात आली. ही महिला अनुसुचित जातीतील असल्याने महिलेसोबत अशी वर्तवणूक केल्याची चर्चा सर्वत्र पसरली. महिलेने मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप लावले.
मंत्र्याने महिलेसोबत केले भोजन
राज्यभरात ही बातमी सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखी पसरली तेव्हा तातडीने मंत्र्याने याची दखल घेतली. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मंदिर प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली होती. तामिळनाडूतील मंत्री पी के शेखर बाबू यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या महिलेला आणि अन्य लोकांना अधिकाऱ्यांसह मंदिरात अन्नदान कार्यक्रमावेळी बोलावलं. त्यानंतर महिलेसोबत नारिकुराव जातीच्या अन्य लोकांना बरोबर घेऊन मंत्र्याने मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांना खरडपट्टी काढत महिलेसोबत जेवण केले. सर्व लोकांना एकसमान वागणूक दिली पाहिजे. सर्वांचा आदर राखला पाहिजे असा संदेश मंत्र्यांनी त्यांच्या कृतीतून जनतेला दाखवून दिला.