चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. या मतदानाला दिग्गज स्टारमंडळीनीही हजेरी लावली. राज्यातील 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. मतदानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून तमिळ सुपरस्टार थलपती विजय याची मतदान केंद्रावरील एंट्री चर्चेचा विषय ठरली आहे.
तामिळनाडूसह, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथेही विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यापैकी, तमिळनाडू, आसाम आणि पदुद्चेरी तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. तमिळ सुपरस्टार थलापती विजय यानेही मतदान केले. मात्र, सायकलवरुन मतदान केंद्रावर केलेली एंट्री पाहून त्याचे चाहते क्रेझी झाल्याचं पाहायला मिळालं.
थलपती विजयच्या सायकलस्वारीचे चाहत्यांनी अनेक फोटो काढले, तसेच सोशल मीडियावरही हे फोटो व्हायरल झाले आहेत. काहींनी याचा व्हिडिओही शूट केला आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. सुपरस्टार विजयने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून सायकलवरुन मतदान केंद्र गाठल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र, रियाझ अहमद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
मतदान केंद्र हे थलापती विजयच्या घरापासून उजव्या हाताला जवळच होते. त्यामुळे, रस्त्यावरुन कारने जाण्याने ट्रॅफिकचा सामना करावा लागेल, त्यात गर्दी होईल. म्हणून, विजयने सायकलवरुन मतदानाला जाण्याचा निर्णय घेतला. यामागे, इतर कुठलेही कारण नसल्याचे अहमद यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलंय.
पीपीई कीट घालून केले मतदान
कोरोनाचा संसर्ग झालेले द्रमुकचे खासदार के. कनिमोळी यांनी चेन्नईच्या मायलापूर येथील मतदान केंद्रावर पीपीई किट घालून मतदान केले. कोरोना संक्रमित रुग्णांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा ते सात यासाठी एक तासाचा वेळ दिला आहे.
कमल हसन यांच्या पक्षांचीही एंट्री
द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपासह कमल हसन ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 'मक्कल निधी मय्यम', हा कमल हसन यांचा पक्ष आहे. दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारण प्रवेश करणार होते. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत हे तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करणार होते. मात्र, रजनीकांत यांच्या राजकारणात न उतरण्याच्या निर्णयावर कमल हसन नाराजी व्यक्त केली होती.