तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. युट्यूबवरील पद्धत पाहून पती पत्नीची नॅचरल डिलिव्हरी करून घेत असल्याचा आरोप केला जात आहे. याच दरम्यान महिलेला खूप रक्तस्त्राव होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. 22 ऑगस्ट रोजी ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोचमपल्लीजवळील पुलियामपट्टी येथील रहिवासी लोगानायाकी (27 वर्षे) नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती वेदना सुरू असताना लोगानायाकीचा पती मधेश याने घरीच नॅचरल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने मुलाला जन्म दिल्यानंतर आरोग्यविषयक महत्त्वाच्या असलेल्या योग्य गोष्टी न केल्याने जास्त रक्तस्त्राव झाला आणि महिला बेशुद्ध झाली. घाईघाईत लोगानायाकीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात यूट्यूबवर व्हिडीओ पाहून डिलिव्हरी केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल.
पतीने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली डिलिव्हरी
तपासात पोलिसांना पुरावे मिळाल्यास आरोपी पतीला अटक होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. पतीने यूट्यूबवर होम डिलिव्हरीची माहिती गोळा केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अपूर्ण माहितीमुळे, प्रसूती यशस्वी होऊ शकली नाही आणि लोगानायाकीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. एका आरोग्य कर्मचाऱ्याने माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि महिलेचा होम डिलिव्हरीमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.