नाशिक : विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून करदात्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नाशिकमधील काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे काही करदात्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केलेली असताना त्यांनाही ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टल हॅक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नाशिकमधील काही जाहिरात व्यावसायिक आणि कर सल्लागारांना जीएसटी पोर्टलवरून तुम्ही तुमचा यूजर आयडी व पासवर्ड विसरला आहात. पुन्हा रिसेट करण्यासाठी दिलेला ओटीपी वापरा, असा संदेश प्राप्त झाला. विशेष म्हणजे, यातील एकाही करदात्याने लॉगीन केले नव्हते. त्यामुळेच जीएसटी पोर्टलशी छेडछाड होत असून, करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्याचा संशय राजेश कुलकर्णी, मंगेश करंदीकर आदी करदात्यांसह सनदी लेखापाल सनी मनियार यांनी व्यक्त केला.याप्रकरणी जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप जीएसटी विभागाला प्राप्त झाली नसल्याचे जीएसटीचे सहायक आयुक्त चेतन पवार यांनी सांगितले.जीएसटी पोर्टलवरून रविवारी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ओटीपी आला, याचा अर्थ जीएसटी पोर्टलशी कोणीतरी छेडछाड केली आहे. त्याशिवाय असा ओटीपी येणार नाही. ओटीपी येताच सीएला फोन केला. त्यांनी जीएसटी संदर्भात काहीही काम केले नसल्याचे स्पष्ट केले.- राजेश कुलकर्णी,जीएसटी करदाताजीएसटी पोर्टलवर कोणतेही काम सुरू नसताना पहाटे साडेपाच वाजता ओटीपी आला. छेडछाड झाल्याशिवाय अशाप्रकारे लॉगीन न करता ओटीपी येऊ शकत नाही.-सनी मनियार, सनदी लेखापाल
जीएसटी पोर्टलशी छेडछाड; माहिती चोरण्याचा प्रयत्न, वेबसाइट हॅक झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:39 AM