Congress Leaders Meeting With EC: हरयाणा विधानसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. कालच्या निकालानंतर काँग्रेस नेहमीप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर फोडत आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींनी कालच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच, आज (09 ऑक्टोबर) काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून काँग्रेस नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता. तसेच, निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावरुन टीकाही केली होती.
दरम्यान, आयोगासोबत बैठकीनंतर काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, "आज केसी वेणुगोपाल, अशोक गेहलोत, जयराम रमेश, अजय माकन, भूपेंद्र सिंह हुडा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आम्ही आयोगाला 20 तक्रारींबद्दल माहिती दिली. मोजणीच्या दिवशी काही मशीन्सच्या बॅटरी 99% तर काही मशीन्स 60-70% वर होत्या. तपास पूर्ण होईपर्यंत त्या मशीन सीलबंद आणि सुरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी आम्ही केली. उर्वरित तक्रारी येत्या 48 तासांत त्यांच्यासमोर मांडू, असेही आयोगाला सांगितले आहे."
"निवडणूक आयोगाने आम्हाला आश्वासन दिले आहे की, ते प्रत्येक मतदारसंघातील रिटर्निंग अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून आम्हाला उत्तर देतील. या तक्रारी 20 विधानसभा मतदारसंघातील होत्या. आम्ही तक्रारींची कागदपत्रे न्यायालयाकडे सादर केली आहेत. येत्या 48 तासांत आणखी 13 विधानसभा मतदारसंघातील तक्रारी निवडणूक आयोगाकडे सोपवल्या जातील," अशी माहिती पवन खेरा यांनी दिली.
'पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस अन् ईव्हीएममध्ये भाजप पुढे'दुसरीकडे, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा म्हणाले की, "हरियाणाचे निकाल धक्कादायक आहेत. प्रत्येकाला वाटत होते की, हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाली तेव्हा काँग्रेस सर्वत्र आघाडीवर होती, पण ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली तेव्हा काँग्रेस मागे पडली. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला विलंब झाला, निवडणूक आयोगाने सर्व तक्रारींची दखल घेतील आहे."