नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत. तनुजा सिंग यांनी 2015 साली INHS मुंबई येथे भारतीय लष्कराच्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये लेफ्टनंट म्हणून कायमस्वरूपी कमिशन मिळवले. खरं तर 2017 मध्ये तनुजा सिंग यांचे कॅप्टन पदावर प्रमोशन झाले होते. तर 2021 मध्ये कॅप्टन तनुजा सिंग यांना उत्कृष्ट सेवेसाठी पूर्व कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग कमेंडेशन मेडलने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, मंडी येथील वल्लभ शासकीय महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख फ्लाइंग ऑफिसर डॉ. चमन यांनी म्हटले की, 2022 मध्ये कॅप्टन तनुजा यांचे भारतीय सैन्यात मेजर पदावर प्रमोशन झाले आहे. कॅप्टन तनुजा यांना भारतीय सैन्यात मेजर पद मिळाल्याने मंडी जिल्ह्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
तनुजा यांची गरूडझेप तनुजा यांचे वडील भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्ये कार्यरत होते. मात्र वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी तनुजा यांनी त्यांच्या वडिलांना एका अपघातात गमावले. तनुजा यांची आई रेखा कुमारी यांनी अनेक आव्हाने असतानाही त्यांच्या दोन्ही मुलांचे चांगले संगोपन केले आणि उच्च शिक्षण दिले. मेजर तनुजा सिंग यांच्या आईने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी हमीरपूर आणि चंदीगड येथे काम केले. आपल्या घरातील सदस्य मेजर झाल्यामुळे आजी-आजोबा आणि कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. सध्या मेजर तनुजा सिंग दिल्लीत कार्यरत आहेत.
हमीरपुरमध्ये घेतले शिक्षण तनुजा सिंग यांनी त्यांचे शालेय शिक्षण गुरुकुल स्कूल हमीरपूरमधून घेतले. तर INHS मुंबईतून पदवी स्तरावरील शिक्षण पूर्ण केले. तनुजा यांचा लहान भाऊ अंकुज सिंग याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहाली चंदीगडमधून एमएससी रसायनशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"