आयएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बिहारच्या औरंगाबादमधील एका तरुणीचा दिल्लीतील पावसामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राव आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तिच्या बुडून मृत्यू झाला. या दुर्घटेनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर नगर पंचायत क्षेत्रातील विजय सोनी यांची २४ वर्षीय मुलगी तान्या सोनी हिचाही समावेश आहे.
मुलगी तान्याच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आयएएस अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं स्वप्न होतं. तान्या दिल्लीतील राव कोचिंग सेंटरमध्ये आयएएसची तयारी करत होती. शनिवारी संध्याकाळी तान्या लायब्ररीत बसून मैत्रिणींसोबत अभ्यास करत होती. त्याचवेळी पाणी शिरलं आणि त्यात बुडून तिचा मृत्यू झाला.
तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तान्या गेल्या दीड वर्षांपासून दिल्लीत राहून आयएएसची तयारी करत होती. तिचे वडील विजय सोनी हे तेलंगणात इंजिनिअर आहेत. तान्या हिला आदित्य सोनी हा एक लहान भाऊ आणि पलक सोनी ही धाकटी बहीण आहे.
तान्याच्या मृत्यूची बातमी विविध चॅनलवरून प्रसारित झाल्यावर नातेवाईकांना मोठा धक्का बसला. तसेच तिच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली. तान्याने २०२०-२०२१ मध्ये डीयूच्या महाराजा अग्रसेन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. दिल्लीत ती वसुंधरा एन्क्लेव्हमधील पीजीमध्ये राहत होती. दीड महिन्यापूर्वीच तिने राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता, आयएएस होण्याचं तिचं स्वप्न होतं.