नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी माजी खासदार आणि अभिनेता तापस पॉल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तापस पॉल आणि सुलतान अहमद यांचे निधन केंद्र सरकारच्या संस्थांनी टाकलेल्या दबावामुळेच झाल्याचा आरोप ममता यांनी केला. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटले.
बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते तापस पॉल यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. एक फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर तापस यांच्या प्रकृतीत बिघाड झाली होती. त्यानंतर ते 6 फेब्रुवारीपर्यंत व्हेंटीलेटरवर होते, असं त्यांच्या पत्नी नंदिता यांनी सांगितले.
तापस पॉल यांच्या निधानंतर ममता म्हणाल्या की, सरकारच्या दबावामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन लोकांनी दडपण घेऊन प्राण सोडला आहे. यामध्ये टीएमसीचे खासदार प्रसून बॅनर्जी यांचे नावही ममता यांनी जोडले आहे. सध्या अनेकांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. मात्र सरकारी संस्था या लोकांवरील आरोप निश्चित करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ममता यांनी केंद्र सरकारच्या संस्थावर केला आहे.
दरम्यान कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. परंतु, मला तरी वाटत नाही की, तापस आणि इतर दोन नेत्यांनी काहीही गुन्हा केला असेल, असंही ममता यांनी नमूद केले आहे. 2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.