ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - असहिष्णुतेवरुन केलेल्या वक्तव्यावर आमिर खानला टार्गेट करत स्नॅपडीलला त्याला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवण्यास भागा पाडा असा आदेश भाजपाकडून देण्यात आला होता. हा धक्कादायक खुलासा भाजपाच्या माजी सोशल मिडिया स्वयंसेवक साध्वी खोसला यांनी केला आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या 'I am a Troll' या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. एखाद्यावर दबाव आणण्यासाठी पक्षाकडून अनेक मुद्यांवर ट्रोल करण्यास सांगण्यात येत असे, यामध्ये आमिर खानच्या असहिष्णुता वक्तव्याचाही समावेश होता. आमीर खानचं ते वक्तव्य सरकारवर टीका म्हणून पाहिलं गेलं होतं.
पक्षाकडून वारंवार मिळणा-या या अशा प्रकारच्या आदेशांमुळे अस्वस्थ झालेल्या साध्वी खोसला यांनी 2015 मध्ये भाजपाच्या मिडिया सेलमधून राजीनामा दिला होता. 'हा न संपणारा द्वेष आणि हटवाद होता. यामध्ये अल्पसंख्यांक, गांधी कुटुंब, पत्रकार, उदारमतवादी सोबतच जे कोणी मोदींविरोधात असेल त्यांना टार्गेट केलं जात होतं,' असं साध्वी खोसला यांनी सांगितलं आहे. साध्वी यांनी आपल्याला व्हाट्सअॅपवर मिळालेले मेसेजही शेअर केले आहेत. हे असले आदेश हजारो स्वयंसेवकांना गेले होते. साध्वी यांच्या म्हणण्यानुसार भाजपाच्या आयटी सेलची कोअर टीम स्वयंसेवकांचे किमान 20 व्हाट्सअॅप ग्रुप सांभाळते ज्यामध्ये वय आणि कामानुसार विभाजन करण्यात आले आहे.
आमिर खानला टार्गेट करण्याचा आदेश भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांच्याकडून आल्याचं साध्वीने सांगितलं असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. एका आदेशात स्नॅपडीलने आमिर खानला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवावं अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका सुरु करण्यास सांगण्यात आलं होतं.
साध्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकारणी हिट लिस्टवर होते. यामध्ये पत्रकार बरखा दत्त आणि राजदीप सरदेसाई यांचाही समावेश होता. अनेकदा ट्रोल करताना नाव गुपित ठेवलं जायचं. अनेकदा तर लैंगिक हिंसा करण्याचीही धमकी दिली जात असल्याचंही साध्वी यांनी सांगितलं आहे.
'महिला पत्रकारांनाही जेव्हा बलात्काराची धमकी दिल्या गेल्या तेव्हा मात्र माझ्या संयमाचा बांध तुटला. मी डोळे झाकून त्यांना फॉलो करु शकत नव्हते. रोज एका नवीन व्यक्तीला टार्गेट केलं जात असेल, यामुळे माझा श्वास गुदमरत होता', असं साध्वी यांनी पुस्तकातून सांगितलं आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांच्याकडे जेव्हा या आरोपांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा 'साध्वी खोसला काँग्रेसला समर्थन देतात, असले आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असल्याचं', बोलले आहेत. भाजपाने कधीच ट्रोलिंगला पाठिंबा दिलेला नाही असा दावाही त्यांनी केला आहे. तसंच 2015 ला पक्षाची नव्याने बांधणी करण्यात आली तेव्हापासून मी सोशल मिडिया सांभाळत नसल्याचंही ते बोलले आहेत.