पणजी : गोवा तसेच महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अॅण्ड सिरियाचा (इसिस) डाव होता आणि त्याची जबाबदारी निजामुद्दिन नामक इसिस हस्तकाला देण्यात आली होती. त्यासाठी दोन्ही राज्यांमधील गजबजलेल्या ठिकाणांची त्याने टेहळणी केली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपासी यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत समोर आली आहे. निजामुद्दिनला शुक्रवारी उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआएने त्याला ताब्यात घेतले. उत्तर गोव्यात मोठे अतिरेकी हल्ले घडवून आणण्याचे इसिसचे लक्ष्य होते, अशी माहिती त्याने निजामुद्दिनने चौकशी दरम्यान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तामीळनाडू या राज्यांमध्ये तो फिरला होता. इसिसचा गोव्यातील प्रमुख रिझवान याच्याशी निजामुद्दिन संपर्क साधून होता, अशी माहितीही त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी आणि देशी नागरिक गोव्यात येतात, हे ध्यानी घेऊनच इसिसने गोव्याला लक्ष्य ठरविले असावे, असा तपास यंत्रणेचा कयास आहे. (प्रतिनिधी)
गोवा, महाराष्ट्र ‘इसिस’चे टार्गेट
By admin | Published: January 24, 2016 12:25 AM