'5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी', पंतप्रधान मोदींनी थेट आकडेवारीच मांडली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 09:39 PM2023-12-29T21:39:34+5:302023-12-29T21:40:11+5:30
'2014 साली भारताची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन होती, ती 2023 मध्ये साडेतीन ट्रिलियन झाली.'
नवी दिल्ली: भारताचीअर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि आगामी काळातही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, आगामी काळासाठी 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आम्ही ठेवल्याचे सांगत थेट आकडेवारीच मांडली.
पीएम मोदींनी इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, 'आमचा ट्रॅक रेकॉर्ड बोलतोय. 2001 मध्ये मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे 26 अब्ज डॉलर (2.17 लाख कोटी रुपये) होता. मी पंतप्रधान होण्यासाठी गुजरात सोडले, तेव्हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा आकार 133.5 अब्ज डॉलर्स (11.1 लाख कोटी रुपये) झाला. आम्ही केलेल्या अनेक धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम म्हणून, आज गुजरातची अर्थव्यवस्था सुमारे 260 अब्ज डॉलर्स (21.6 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.'
'त्याचप्रमाणे 2014 मध्ये मी पंतप्रधान झालो, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर्स (167 लाख कोटी रुपये) होती आणि 2023-24 च्या अखेरीस भारताचा अर्थव्यवस्था 3.75 ट्रिलियन डॉलर (312 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त झाली आहे. आगामी काळात ही आणखी वाढणार आहे. हा 23 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवितो की, आमचे लक्ष्य वास्तववादी लक्ष्य आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधक महागाईवरुन आरोप करतात, त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'शतकातील सर्वात मोठी कोरोनासारखी महामारी आली. यामुळे जागतिक पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली, जगभरात मंदीचा दबाव निर्माण झाला. अशा काळातही भारताने चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत 2014-15 आणि 2023-24 (नोव्हेंबरपर्यंत) सरासरी महागाई दर केवळ 5.1 टक्के होता. मागील 10 वर्षांमध्ये (2004-14) हा 8.2 टक्के होता.'
विरोधकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले की, '2023-24 च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांपर्यंत लक्षणीय वाढ केली. 2013-14 मध्ये यावर फक्त 1.9 लाख कोटी रुपये खर्च केला होता. भारताने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मेट्रो मार्गांची लांबी 248 किमीवरून 905 किमीपर्यंत नेली, त्यातून रोजगार निर्माण नाही झाला का? भारताने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत विमानतळांची संख्या 74 वरून 149 वर नेली, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का? 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून 706 पर्यंत वाढली, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का?'
'2014 च्या तुलनेत रस्त्यांचे बांधकाम दुप्पट झाले, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का? आम्ही श्रमशक्तीचा सहभाग वाढवला. 2018-19 मध्ये 50.2 टक्क्यांवरुन 2022-23 मध्ये 57.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. 31 मार्च 2022 रोजी ईपीएफओचे 27.74 कोटी सदस्य होते, तर 31 मार्च 2014 रोजी केवळ 11.78 कोटी सदस्य होते. रोजगाराच्या संधी किंवा नोकऱ्या वाढल्या आहेत, याचे हे आकडे साक्षीदार आहेत,' असंही पीएम मोदी यावेळी म्हणाले.