ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादाची निर्यात करणार असेल तर, भारतीय लष्करही नियंत्रण रेषा ओलांडायला मागे-पुढे पाहणार नाही. 29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
दहशतवादाच्या विषयावर भारताची भूमिका 1999 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाकिस्तानने त्यावेळी कारगिलमध्ये घुसखोरी करुनही भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. फक्त पाकिस्तानी सैन्याला भारतीय भूमीतून पिटाळून लावले होते. भारताची आताची भूमिका त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असे सूत्रांनी सांगितले.
दहशतवादी भारतावर हल्ले करणार असतील तर, भारतही त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राखून आहे. पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सहा जानेवारी 2004 रोजी पाकिस्तानच्या नियंत्रणातील प्रदेशातून भारता विरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानला आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे. दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-या पाकिस्तानी लष्कराला संदेश देण्याचा या सर्जिकल स्ट्राईक्स मागचा मूळ उद्देश होता असे या अधिका-यांने सांगितले.