महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेचा विचार महात्मा गांधींनी दिला होता, पण त्याचा काही लोकांना विसर पडला, असेही ते म्हणाले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि साफसफाई केली.
स्वच्छता अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले की, "स्वच्छता मोहिमेंतर्गत जे आपण आज करतोय, ते यापूर्वी का झाले नाही?", असा सवाल त्यांनी केला.
आता अनेक लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत -मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "एक मोठा वर्ग होता, ज्याला घाण करणे त्याचा अधिकार वाटत होता. कोणी स्वच्छता करत असेल, तर त्यांना हिणवायचा आणि अंहकाराने जगायचे. जेव्हा मी स्वच्छता करायला लागलो, तेव्हा त्यांना वाटले की, मी जे करतोय तेही मोठे काम आहे. आता अनेक लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत. स्वच्छ भारत अभियानामुळे मोठे मानसिक परिवर्तन झाले आहे आणि स्वच्छता करणाऱ्यांना आदर मिळत आहे."
"गांधीजींच्या नावाने फक्त मते घेतली"
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मन की बात कार्यक्रमात मी जवळपास ८०० स्वच्छता कार्यक्रमांचा उल्लेख केला. लोक स्वच्छता ठेवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना पुढे आणत आहेत. मी बघतोय की, जे आज होत आहे, ते यापूर्वी का झाले नाही?"
"महात्मा गांधींनी तर हा रस्ता दाखवला होता. सुचवलेही होते. काही लोकांनी गांधीजींच्या नावाने फक्त मते घेतली, पण त्यांचा विचार विसरून गेले. ते लोकांनी अस्वच्छतेलाच आयुष्य मानले", असे म्हणत पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला.