म्हापसा : तरुण तेजपाल यांनी आपल्या सहकारी महिला पत्रकारावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणी दरम्यान केलेल्या अर्जावरील पुढील सुनावणी आता ११ जून रोजी घेण्यात येणार आहे. या खटल्यावर एप्रिल महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान केलेल्या तेजपालने केलेल्या तीन अर्जांतील दोन अर्ज १७ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने निकालात काढले होते. तिसरा अर्ज तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा असल्याने त्यावरील सुनावणी शुक्रवार, दि. ४ मे रोजी ठेवण्यात आलेली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांना तज्ज्ञासहित न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तिसरा अर्ज हा क्लोन कॉपीजशी संबंधीत असल्याने त्यावरील सुनावणीनंतर तोही निकालात काढला जाईल. काल झालेल्या सुनावणीवेळी तेजपाल यांच्या वतिने तज्ज्ञ न्यायालयात उपस्थित होता तर सरकारच्या वतिने तज्ज्ञ न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही. साहाय्यक सरकारी वकिल अॅड. सिंथीया सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी तज्ज्ञाचा कार्यक्रम पूर्व नियोजीत ठरलेला असल्याने ते सुनावणीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची माहिती सुनावणीच्या वेळी न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलून ती ११ जून रोजी संध्याकाळी ठेवण्यात आली आहे. संबंधित खटल्यावरील मूळ सुनावणी दरम्यान तरुण तेजपाल यांनी न्यायालयाजवळ तीन अर्ज सादर केले होते. केलेल्या अर्जावर १७ एप्रिल रोजी युक्तिवाद झालेला. झालेल्या युक्तिवादात न्यायालयाने त्यातील दोन अर्ज निकालात काढले होते तर तिसºया अर्जावर तज्ज्ञाची मदत आवश्यक असल्याने त्यावरील सुनावणी पुढील महिन्यात ४ मे रोजी ठेवण्यात आली होती. तेजपाल यांच्यावतीने अॅड. श्रीकांत शेवडे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. काल झालेल्या सुनावणीवेळी तरुण तेजपाल स्वत: न्यायालयात हजर होते. बांबोळी येथील तारांकित हॉटेलातील आयोजित थिंक फेस्ट दरम्यान तेहलकाचे माजी संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी आपल्या सहकारी महिला पत्रकारावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणी सध्या म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. विजया पोळ यांच्या न्यायालयात सुरु आहे.
तरुण तेजपाल यांच्या अर्जावरील सुनावणी ११ जून रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 12:57 PM