पणजी, दि. २६ - लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकाचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे तेजपालवर २८ सप्टेंबर रोजी म्हापसा सत्र न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सहकारी पत्रकार महिलेवरील बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यावर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया म्हापसा न्यायालयात सुरू केली असता त्याला तेजपालने आक्षेप घेतला होता. ही कारवाई त्वरित रोखण्यात यावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल करण्या आली होती. तांत्रिक बाजूवर बोट ठेऊन या प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करण्याची मागणी तेजपालचे वकील अमन लेखी यांनी केली होती. तेजपालला खोट्या प्रकरणात गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते. क्राईम ब्रँचने त्याला जोरदार आक्षेप घेतला होता. काय खरे आणि काय खोटे याचा छडा खटला चालवूनच लावणे योग्य होईल असे अॅड सरेश लोटलीकर यांनी न्यायालयाला सांगितले होते. मंगळवारी या प्रकरणात निवाडा देताना तेजपालची याचिका खंडपीठाने फेटाळली. तसेच या प्रकरणाचा खटला म्हापसा न्यायालयात चालणार असल्याचे सांगितले. २८ सप्टेंबर रोजी म्हापसा न्यायालयात तेजपालवर आरोप निश्चित केले जातील. दरम्यान तेजपाल यांना दिलासा दिला नसला तरी त्यांची याचिकाही निकालात काढण्यात आलेली नाही. हे प्रकरण पुन्हा नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.या प्रकरणात तेजपालविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या आरोपांना खंडपीठाची मंजुरी मिळाल्यानंतरच खटला सुरू करण्यात यावा असेही खंडपीठाने सुनावले.
‘न्यायाधीश नव्हे, आक्षेप निरर्थक’आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे निरर्थक असल्याचे स्पष्ट करूनही आणि आपल्याविरुद्ध ज्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ती कलमे आपल्याविरोधात लागू होत नाही हे सांगूनही म्हापसा न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही. या प्रकरणात आदेश देताना न्यायाधिशाने बुद्धीचा वापर केला नाही असे तेजपालचे वकील लेखी यांनी खंडपीठात न्यायमूर्ती पृथ्विराज चव्हाण यांच्यासमोर केला. परंतु क्राईम ब्रँचचे वकील अॅड सरेश लोटलीकर यांनी जोरदार आक्षेप घेताना म्हापसा न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्यासाठी पूर्ण वेळ दिली होती आणि आदेश सुनावताना ४७ पानी स्पष्टीकरणही दिले होते असे सांगितले. तेवढे सांगून ते म्हणाले की ‘न्यायाधीशाने बुद्धीचा वापर केला नाही हे चुकीचे असून वास्तवीक तुमचे आक्षेप निरर्थक आहेत’ असे सांगितले.