म्हापसा : कित्येक वर्षाच्या विलंबानंतर तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी त्याच्या सहका-यावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्यावरील सुनावणी आता पुढील महिन्यात फेब्रुवारी २६ पासून होणार आहे. सतत चार दिवस घेण्यात येणा-या या सुनावणीची सुरुवात पीडित महिला पत्रकाराच्या जबानीतून होणार आहे. सदरची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात येणार असल्याचे आज मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश विजया पोळ यांनी या संबंधीचा आदेश दिला.तरुण तेजपाल यांच्यावर म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आरोप खोटे असल्याने ते रद्द करण्यात यावेत यासाठी त्यांनी खंडपीठाजवळ केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून फेटाळून लावल्यानंतर त्याच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्रावरील सुनावणी आज अतिरिक्त सत्र न्यायालयात घेण्यात आली. तेजपालच्या वतीने आज युक्तिवाद मांडताना अॅड. प्रमोद कुमार दुबे यांनी न्यायालयाजवळ युक्तिवाद मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. केलेली विनंती अर्जाच्या स्वरुपात देण्याचा आदेश न्यायालयाने त्यांना यावेळी दिला. यावेळी तेजपालच्या वतीने अर्ज सादर करण्यात आल्यानंतर खटल्यावरील सुनावणी फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.त्यामुळे २६ फेब्रुवारी ते मार्च १ पर्यंत सतत चार दिवस आता सुनावणी होणार आहे. सुनावणीची सुरुवात पीडित महिला पत्रकाराची जबानी नोंद करून होणार आहे. त्यानंतर आरोपपत्रात नोंद करण्यात आलेल्या इतर साक्षीदारांच्या जबाब नोंद करून घेण्यात येणार असून जबानीनंतर त्यांची उलट तपासणी सुरू होणार असल्याची माहिती सरकारी वकील फ्रान्सिस ट्रावोरा यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी काल मर्यादा निश्चित केल्याने योग्य वेळात सुनावणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. तेजपालचे वकिल अॅड. प्रमोद कुमार दुबे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारी पक्षाकडून सुरुवातीला बाजू मांडण्यात आल्यानंतर बचाव पक्षाच्या वतिने उलट तपासणी तसेच युक्तीवाद मांडला जाणार असल्याचे सांगितले. या खटल्यात आपल्या पक्षाची बाजू सक्षम असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.२०१३ साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात १५० साक्षीदार नोंद करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.
तरुण तेजपाल यांच्या खटल्यावरील सुनावणी फेब्रुवारीत सतत चार दिवस चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 5:25 PM