पणजी : पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याची तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.तेजपालच्या याचिकेवरील सुनावणी १२ डिसेंबरला पूर्ण झाली होती़ न्या़ नूतन सरदेसाई यांनी निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने तेजपालच्या विरोधात निर्णय दिला. आरोपपत्र रद्द करण्याची त्याची मागणी फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्याला वेळ दिला आहे. खंडपीठाच्या निवाड्याविरुद्ध ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे.युवतीवरील बलात्कार प्रकरणात आपल्यावर ठेवलेले आरोप हे खोटे असून ते रद्द करण्यात यावेत, असे तेजपालने म्हटले होते. म्हापसा विशेष न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर तेजपालने त्यांना खंडपीठात आव्हान दिले होते. तेजपालचे वकील अमर लेखी यांनी जुनेच युक्तिवाद करताना आरोप निराधार असल्याचे सांगितले. गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राइम ब्रँच) सीसीटीव्ही फूटेज दिलेले नाही. क्राइम ब्रँचचे वकील सरेश लोटलीकर यांनी तेजपालची याचिका म्हणजे वेळकाढू धोरण असल्याचे सांगितले होते.
आरोपपत्र रद्द करण्याची तरूण तेजपालची याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:19 AM