नवी दिल्ली - भाजपाचे माजी खासदार तरुण विजय यांचे ट्विटर अकाऊंट मंगळवारी (4 सप्टेंबर) हॅक करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ट्विट्समुळे तरुण विजय सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाले. तरुण विजय यांच्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हल्लाबोल चढवणारे आणि काँग्रेस पक्ष व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे समर्थन दर्शवणारे ट्विट्स करण्यात आले होते. दरम्यान, नेटीझन्सकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट्स डिलीट केले. सुरुवातीला तरुण विजय यांच्या ट्विटर अकाऊंटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेसंदर्भात ट्विट करण्यात आले.
पहिले ट्विट :
''जे कोणी राहुल गांधी यांची कैलास यात्रेवरुन टर उडवत आहेत, त्यांनी तसे करू नये. हिंदूंनी असे वागू नये. शंकराहून मोठे कोणीही नाही. मी स्वतः तीन वेळा कैलास मानसरोवरची यात्रा केली आहे आणि मानसरोवर यात्रा संघाचं अध्यक्षपदही भूषवले आहे'', असे ट्विट त्यांनी केली होते.
(कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं)
दुसरे ट्विट :दुसरे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करत हल्लाबोल केला आहे. ''केवळ लोकप्रिय आहात म्हणून नाही तर तुमच्यामागे जनतेचं पाठबळ असल्यानं तुम्ही पदावर आहात. अहंकार जरा कमी करा'', असे ट्विट तरुण विजय यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केले होते.
या ट्विट्समुळे तरुण विजय यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यानंतर, ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या व्यक्तीची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती त्यांनी बुधवारी (5 सप्टेंबर) सकाळी दिली.