ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांवर कारवाई केल्यानंतर दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि केंद्र सरकारमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार सीबीआयला हाताशी धरुन विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला.
सीबीआयला विरोधी पक्षांना टार्गेट करण्याचे काम दिले आहे. जे ऐकणार नाहीत त्यांना संपवण्यास सांगितले आहे. कालच मला एका सीबीआय अधिका-याने ही माहिती दिली असा दावा केजरीवालांनी आपल्या टि्वटसमध्ये केला आहे.
प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारल्यानंतर आम आदमी पक्ष केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. आधी केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्याड, मनोरुग्ण म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आपने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले. अरुण जेटली दिल्ली क्रिकेट संघटना डीडीसीएचे अध्यक्ष असताना मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपने केला आहे.