भारताला लष्करीदृष्ट्या महत्वाचे असलेले नवीन C-295 वाहतूक विमान बुधवारी मिळणार आहे. हवाई दलाचे मुख्य एअर चिफ मार्शल या विमानाची डिलिव्हरी घेण्यासाठी स्पेनमध्ये दाखल झाले आहेत. अतिशय अवघड प्रदेशांत, कमी धावपट्टी असलेल्या विमानतळांवर हे विमान भारतीय लष्कराला दळणवळणासाठी उपयुक्त असणार आहे.
दोन वर्षांपूर्वी भारताने स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा यांच्यात 21,935 करोड़ रुपयांची डील केली होती. याद्वारे ५६ विमाने भारताला मिळणार आहेत. यापैकी बहुतांश विमाने ही टाटाच्या प्रकल्पात बनविली जाणार आहेत. लष्करासाठी उपयुक्त असे हे विमान बनविण्यात आले आहे. अन्य कार्गो विमानांच्या तुलनेत या विमानाचा टेकऑफ टाईम खूपच कमी आहे.
हे विमान 844 मीटरच्या धावपट्टीवरून टेक ऑफ करू शकते तर लँडिंगसाठी फक्त 420 मीटर लांबीची धावपट्टी आवश्यक आहे. या विमानात हवेत इंधन भरण्याची सुविधा आहे आणि ते 11 तास सतत उडू शकते. C-295 डोंगराळ भागासाठी उपयुक्त आहे. नऊ टन पेलोड किंवा 71 सैनिक वाहून नेले जाऊ शकतात. हे विमान इजिप्त, कॅनडा, पोलंड आणि स्पेन यांसारखे देश वापरत आहेत.
56 विमानांपैकी पहिली 16 विमाने स्पेनमध्ये आणि उर्वरित भारतात बांधली जाणार आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडद्वारे याचे उत्पादन घेतले जाणार आहे. C-295 एका इंजिनच्या मदतीने 13 हजार 533 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते आणि दोन्ही इंजिने काम केल्यास 30 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते. मदतकार्यातही हे विमान चांगले मानले जाते.