ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सहारा समूहाची मालमत्ता खरेदी करण्यासाठी टाटा, गोदरेज, अदानी आणि पतंजली यांसारख्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यां पुढे सरसावल्या आहेत. सहाराच्या 30 जागांची किंमत जवळपास 7400 कोटींच्या घरात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाराच्या भूखंडांची खरेदी करण्यासाठी ओमॅक्स आणि एल्डको यांसारख्या रिअल इस्टेट कंपन्यांसोबत इंडियन ऑइल सुद्धा उत्सुक आहे. तर, लखनऊ येथील सहारा हॉस्पिटल घेण्यास चेन्नई स्थित अपोलो हॉस्पिटल तयार असल्याचे समजते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, लवकरच सहाराला आपल्या मालमत्तेची विक्री करावी लागणार आहे, कारण या विक्रीतून मिळणारी रक्कम सेबीकडे जमा करावी लागणार आहे.
दरम्यान, खरेदीदारांनी यासंदर्भात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. या खरेदीदारांची नावे अद्याप उघड झाली नसून सहारा समूहाच्या एका प्रवक्त्याने ती सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. तसेच, विक्रीसंदर्भातील प्रक्रिया सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्या प्रवक्त्याने सांगितले.