मुंबई : १00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. रतन टाटा यांनी हंगामी चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला असून, नवा चेअरमन निवडण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ४८ वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी ७८ वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मिस्त्री यांना पदावरून तातडीने काढण्यामागील कारण जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, मिस्त्री यांच्या कामावर ‘टाटा सन्स’ समाधानी नव्हती. नफ्यात नसलेल्या उद्योगांकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे समजते. मिस्त्री यांना पदमुक्त केल्याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
टाटा समूहाचे चेअरमनपद पुन्हा रतन टाटांकडे
By admin | Published: October 25, 2016 5:11 AM