नवी दिल्ली :टाटा ग्रुपकडून मॉर्डना कंपनीची कोरोना लस भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, भारताला लवकरच तिसरी कोरोना लस मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
इकॉनॉमिक टाइम्स यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार, टाटा समूहाची आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक भारतात कोरोना लस लॉन्च करण्यासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीशी चर्चा करत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सरकारी नियमानुसार, कोणत्याही परदेशातील कंपनीची कोरोना लस भारतात आणायची असेल, तर देशातील स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणे आवश्यक आहे. टाटा समूहाला भारतात कोरोना लस आणायची असेल, तर केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्यासह मॉडर्ना लसीची चाचणी करावी लागणार आहे.
मॉडर्ना कोरोना लस ही ९४.१ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. मॉडर्ना कोरोना लसीच्या वापराला अमेरिकेसह कॅनडा, ब्रिटन येथेही मंजुरी देण्यात आली आहे. उणे २० अंश तापमानात ठेवल्यास ही लस सहा महिने टिकू शकते. मॉडर्ना लसीची परिणामकारकता अधिक असून, याचे दुष्परिणाम कमी आहेत, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली पहिली कोरोना लस सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या मदतीने तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीसह भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली असून, १६ जानेवारी रोजी भारतात देशव्यापी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत १६ लाख १५ हजार ५०४ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
तत्पूर्वी भारताने २० जानेवारी २०२१ पासून शेजारी देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, मॉरिशियस आणि सेशल्स या देशांना कोरोना लसीचे हजारो डोस पाठवण्यात आले आहेत.