नवी दिल्ली : टाटा समूहामध्ये टाटा कुटुंबातील सदस्यांना कोणतेही विशेषाधिकार देण्यात आलेले नाहीत. टाटा ट्रस्टचा पुढील अध्यक्ष कदाचित टाटा कुटुंबाबाहेरीलही असू शकतो, असे प्रतिपादन टाटा ट्रस्टचे विद्यमान चेअरमन रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केले आहे.
रतन टाटा यांनी न्यायालयास सांगितले की, टाटा ट्रस्टचा मी सध्या चेअरमन आहे. तथापि, भविष्यात अन्य कुणी तरी या पदावर असेल. त्याचे आडनाव टाटाच असले पाहिजे असे आवश्यक नाही. माणसाचे आयुष्य मर्यादित असते. याउलट संस्था दीर्घकाळ चालत असतात.सायरस मिस्री यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात रतन टाटा यांनी म्हटले की, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी राहण्यासाठी टाटा कुटुंबाला कोणतेही अंतस्थ अधिकार नाहीत. टाटा सन्सचे सध्याचे चेअरमनही (एन. चंद्रशेखरन) टाटा कुटुंबातील नाहीत.
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, टाटा सन्समध्ये अथवा व्यवस्थापनात आतापर्यंत टाटा कुटुंबाला (संस्थापकाचे वारसदार अथवा नातेवाईक) कोणतेही विशेषाधिकार मिळालेले नाहीत. तशी कोणतीही तरतूद नाही. कंपनीतील समभागधारक या नात्यानेही कायदेशीररीत्या कोणतेच विशेषाधिकार टाटा कुटुंबाला नाहीत. टाटा सन्समध्ये आपल्या कुटुंबाची हिस्सेदारी ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.