नवी दिल्ली, दि. 8 - टाटा मोटर्सच्या जमशेदपूरमधल्या कारखान्यामध्ये संपसदृष स्थिती असून पगारामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुधवारी कामगारांच्या लक्षात आले की हंगामी कामगारांच्या पगारामध्ये अनियमितता आहे आणि भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास सहा हजार कामगारांनी उपोषणाचे हत्यार उचलल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात एकंदर 10 हजार कर्मचारी आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जुलैमध्ये झालेल्या चर्चेनुसार पगारामध्ये वाढ करण्यात आली होती, मात्र 5 तारखेला झालेल्या पगारामध्ये ही वाढ दिसली नाही. तर सूत्रांच्या हवाल्यानुसार कर्मचारी संपावर गेल्यानंतर व्यवस्थापनाने दखल घेत कामगारांची देणी दिली आहेत. पगाराची पुनर्रचना झाल्यानंतर माझ्या हातात जेवढे पैसे यायला हवे होते त्यापेक्षा 1,896 रुपये कमी मिळाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. आम्ही संपाचे हत्यार उचलल्यावर अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि आमची शिल्लक देणी दिल्याचे एका कामगाराने सांगितले.
तर टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने मात्र तांत्रिक समस्येमुळे ही समस्या निर्माण झाली होती असे म्हटले आहे. कामगारांना जितकी रक्कम मिळायला हवी होती, त्यापेक्षा पे स्लीपमध्ये तांत्रिक चुकीमुळे कमी दाखवली गेल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. ही चूक सुधारण्यात आली आणि नंतर कामगारांचे पैसे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अर्थात, या संधीचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी हंगामी कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे ही जुनी मागणी उचलली आहे. 500 कामगारांना ताबडतोब कायम करावे आणि दरवर्षी 700 या प्रमाणे अन्य कामगारांना कायम करावे अशी मागणी आता करण्यात आली आहे, असे संपात सहभागी झालेल्या कामगाराने सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी टाटा मोटर्सचे व्यवस्थापन प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे."काही कामगार कायमस्वरुपी करण्याची व अन्य काही मागण्या घेत संप करत आहेत. व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात आहे. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत," असे कंपनीने पत्रकारांना सांगितले.
उत्पादनाच्या बाबतीतही परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत. ट्रकचे रोजचे उत्पादन 80 वरून 30 - 40 वर आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे तर व्यवस्थापनाने मात्र शेड्युलप्रमाणे उत्पान होत असल्याचा दावा केला आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर कारखान्यात झालेल्या या वादाचा परिणाम कंपनीच्या शेअरवर काही प्रमाणात शुक्रवारी दिसून आला.