नवी दिल्ली : टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मंगळवारी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर, निर्माण झालेल्या परिस्थितीत ही भेट महत्त्वाची आहे.रतन टाटा आणि जेटली यांनी सुमारे ३0 मिनिटे चर्चा केली. जेटली यांच्याकडेच कंपनी व्यवहार खातेही आहे. जेटली यांच्याशी काय चर्चा झाली, याची माहिती देण्यास ७८ वर्षीय टाटा यांनी नकार दिला. १00 अब्ज डॉलरचे मूल्य असलेल्या टाटा समूहातील नेतृत्व बदलाची माहिती टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून आधीच कळविली आहे. टाटा यांनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. २४ आॅक्टोबर रोजी सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. सुमारे चार वर्षे या पदावर राहिल्यानंतर, त्यांना अचानक हाकलण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यात आणि रतन टाटा यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मिस्त्री यांनीही जेटली आणि मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितलेली आहे. (वृत्तसंस्था)
टाटांनी घेतली जेटलींची भेट
By admin | Published: November 16, 2016 12:18 AM