नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलण्यात आले असले तरी मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाला सुमारे १६ अब्ज रुपये मोजावे लागू शकतात, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. मिस्त्री यांच्या कटुंबाकडे असलेल्या टाटा सन्सच्या समभागांची ही किंमत आहे, असे जाणकारांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांच्या कटुंबाच्या मालकीच्या शापूरजी पालनजी या कंपनीचे टाटा सन्समध्ये १८.४ टक्के समभाग आहेत. शापूरजी पालनजी ही कंपनी सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. मिस्त्री यांना चेअरमनपदावरून काढले तरी शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून ते संचालक मंडळात राहू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढलेली आहे. मिस्त्री संचालक मंडळात असताना कंपनीचा कारभार चालविणे टाटा सन्ससाठी अडचणीचे ठरणार आहे. मिस्त्री यांच्यापासून पूर्ण फारकत घेणे हा त्यावरचा उपाय आहे. तथापि, त्यासाठी मिस्त्री यांची संपूर्ण भागीदारी खरेदी करावी लागेल. मिस्त्री यांच्या कुटुंबाने ती विकायची तयारी दर्शविली पाहिजे, हेही महत्त्वाचे आहे. मिस्त्री यांनी आपले समभाग विकायची तयारी दर्शविल्यास त्याची एकूण किंमत १६ अब्ज डॉलर होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांनी पाठविलेल्या ई-मेलमधून टाटा समूहाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या समूहाचे शुद्ध मूल्य २६ अब्ज डॉलर असल्याचे दिसते. मिस्त्री यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी १८ अब्ज डॉलरवर समूहाला कर्ज आणि तोटा यापोटी पाणी सोडावे लागेल. हे खरे मानल्यास समूहाचे शुद्ध मूल्य अवघे ८ अब्ज डॉलर उरते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रतन टाटा यांच्या वापसीनंतर कंपनीची स्थिती अचानक सुधारेल असे नाही. तरीही जागतिक पातळीवर पोलादाची मागणी वाढत आहे. त्यामुळे २0१७ मध्ये कंपनीचे शुद्ध मूल्य २८ अब्ज डॉलरवर पोहोचू शकते. समजा कंपनीचे २0 टक्के शुद्ध मूल्य बुडीत खाती गेले, मात्र त्याचवेळी कंपनीने ३0 टक्के वृद्धी नोंदविली, तर वर्षानंतर कंपनीचे शुद्ध मूल्य २३ अब्ज डॉलर होऊ शकते. अशा स्थितीत आपल्या १८.५ टक्के समभागासाठी मिस्त्री ३.७५ पट रक्कम मागू शकतात. त्याची एकूण किंमत १६ अब्ज डॉलर होईल. एवढी रक्कम मिळाल्यास हिस्सा विकणे मिस्त्रींसाठी नफ्याचा सौदा होऊ शकतो. कारण या गुंतवणुकीवर कंपनीकडून मिळणारा डिव्हिडंड नगण्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मिस्त्री यांच्यापासून फारकत घेण्यास टाटांना मोजावे लागणार १६ अब्ज डॉलर
By admin | Published: October 29, 2016 2:48 AM