तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:07 AM2023-08-11T10:07:30+5:302023-08-11T10:08:50+5:30
कसभा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला
नवी दिल्ली - लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर मतदानही झाले. तत्पूर्वी या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला होता. अजित पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे यांनी तर शरद पवार यांच्या गटाकडून मोहम्मद फझल यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, मतदानासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे एकटेच विरोधी बाकावर बसल्याचे दिसून आले.
लोकसभा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी, मोदींनी विरोधकांना टोलाही लगावला. काहींना दुसऱ्यांना सांगायला आवडतं, पण दुसऱ्यांचं ऐकायचं धैर्य त्यांना नसंत, असे म्हणत सभागृह त्याग करणाऱ्या विरोधी पक्षावर मोदींना हल्लाबोल केला. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील खासदारांनी यावेळी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे, अविश्वास प्रस्तावातील मतदानालाही यांची अनुपस्थिती होती. मात्र, यावेळी नुकते मोदी सरकारसोबत एनडीएमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार विरोधी बाकावर दिसून आले, ते म्हणजे सुनिल तटकरे.
अविश्वास प्रस्तावार दोन दिवसापासून चर्चा सुरू होती, या प्रस्तावावरील मतदानासाठी शरद पवार गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी व्हीप बजावला. शरद पवार यांच्या गटात लोकसभेत सप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल हे सदस्य आहेत. तर अजित पवार यांच्या गटात सुनिल तटकरे हे एकच सदस्य आहेत. तटकरे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना देण्यात आली. तर, शरद पवार यांच्या गटाकडून काढलेल्या व्हीपमध्ये मोदी सरकार विरोधात मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मतदानावेळी एकटे सुनिल तटकरेच सभागृहात राहिले, त्यांनी मोदी सरकारच्या बाजुने मतदान केले. राष्ट्रवादीच्या इतर खासदारांनी सभागृहाबाहेर जाणे पंसत केले. त्यामुळे, सुनिल तटकरेंवर नामुष्कीची वेळ आल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर अजित पवार यांनी निवडणूक आयोगात पक्षावर दावा केला होता. आता लोकसभा अध्यक्ष कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत असल्याची मान्यता देतात यावर सर्व अवलंबून आहे. आता हे दोन गट एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसत आहे.