अहमदाबाद : केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विनाशाचे थैमान घालणारे तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री उशिरा सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. अतिशय तीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.
सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. त्यावेळी ताशी १९० किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते.
१६ हजारांवर घरांचे नुकसान१६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. सुमारे १६ कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी १२ रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.
१६ जण सुखरूप गुजरातच्या वेरावल बंदराजवळ अडकलेल्या ‘मत्स्य’ तसेच आणखी दोन नौकांमधून १६ जणांची गुजरात तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. तीन नौका मंगळवारी सकाळी समुद्रात गेल्या होत्या.