Tauktae Cyclone: मोदींनी महाराष्ट्र, केरळ यांना जादा मदत करावी, सुब्रमण्यम स्वामींचा मोदींना घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:45 AM2021-05-23T08:45:23+5:302021-05-23T08:46:21+5:30
Tauktae Cyclone: स्वामी यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानभरपाईवरुन सरकारला घरचा अहेर दिला आहे.
नवी दिल्ली: “तौउते” चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि केरळसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला दिलेल्या आर्थिक मदतीपेक्षा जास्त निधी देण्याची मागणी करुन भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना घरचा अहेर दिला आहे.
स्वामी यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानभरपाईवरुन सरकारला घरचा अहेर दिला आहे. या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी एकट्या गुजरताला एक हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करून राज्य सरकारला मदतीचा धनादेशही दिला होता. त्यावरुन स्वामी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, की पंतप्रधान गुजरातला गेले आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला. आता त्यांनी प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे. या ठिकाणी अधिक नुकसान झाले आहे. मात्र, मोदींना त्याची पाहणी करण्यासाठी जाता आले नाही.
यापूर्वीही केलेली टीका
स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारवर टीका केली आहे. गेले काही दिवस स्वामी सतत सरकारविरुद्ध बोलत आहेत. कधी अर्थमंत्री सीतारामन, तर कधी डॉ. हर्षवर्धन यांच्यावर टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वामींच्या ट्विटला महत्त्व आहे. महाराष्ट्र व केरळला मदत द्यावी, असे जाहीरपणे म्हणणारे ते भाजपचे पहिलेच नेते आहेत. महाराष्ट्र वा केरळमधील भाजप नेत्यांनीही ही मागणी केलेली नाही, हे विशेष.
दिल्ली नको, इंद्रप्रस्थ हवे
सुब्रमण्यम स्वामी यांनी राजधानीचे दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिस्त्रा यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. मुघल साम्राज्यातील रेकॉर्ड व ब्रिटिशांनी काढलेल्या अधिसूचनेतही दिल्लीचा इंद्रप्रस्थ असा उल्लेख असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.