नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 9 डिसेंबरला झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही सैनिकांना किरकोळ दुखापत झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनकडून निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे. हा 1962 चा भारत नाही. भारतीय शूरवीर चीनला चोख प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पेमा खांडू यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "यांगत्से माझ्या मतदारसंघात येतो आणि दरवर्षी मी त्या भागातील जवान आणि गावकऱ्यांना भेटतो. आता हा 1962 नाही. कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतील."
काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिले. चिनी सैन्याने 9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमधील यांगत्से प्रदेशातील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले, असे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. तसेच, या झटापटीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक स्तरावरही मांडण्यात आला असून अशा प्रकारची कारवाई करण्यास मनाई करण्यात आली आहे.
चीनने काय सांगितले?तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीवर चीनने सांगितले की, भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे सीमा मुद्द्यांवर सुरळीत संवाद साधला आहे. दरम्यान, वांग यांनी यांगत्से प्रदेशात 9 डिसेंबरला भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची माहिती देण्यास नकार दिला.