नवी दिल्ली : वर्ष २०१६-१७ या करनिर्धारण वर्षासाठी व्यक्तिगत आयकर रिटर्नचे ई-फायलिंग लवकरच सुरू होणार आहे. आयकर विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आॅनलाइन कॅल्क्युलेटरद्वारे करदाते आपल्याला वार्षिक किती कर भरावा लागेल याची माहिती करून घेऊ शकतील. हे टॅक्स कॅल्क्युलेटर आॅनलाइन असून, ते आयकर विभागाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध असेल. त्याद्वारे करदाता टॅक्स रिटर्न फाईल करू शकेल. आयकराच्या चालू मूल्यमापन वर्षासाठी करदात्याने स्वत:ची मूलभूत माहिती अगदी व्यवस्थित भरली की हे कॅल्क्युलेटर काम करू लागेल.ई-फायलिंगची सुविधा ही आयटीआर-१ (वेतनाचे उत्पन्न, एका घराचा मालक आणि इतर उत्पन्न) आणि आयटीआर-४ (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब ज्यांना मालकीचा व्यवसाय किंवा व्यापार आहे) या आठवड्यात आॅनलाइन उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. इतर आयटी रिटर्न सुविधाही लवकरच उपलब्ध होतील, असे आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.आयकराच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात करदात्याने आॅनलाइन फायलिंगवर विसंबून राहू नये असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. कारण अशा प्रकरणात वेगवेगळ्या माहितीची गरज असते व ते प्रश्न हा कॅल्क्युलेटर सोडवू शकत नाही. या वर्षी सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) नवे फॉर्म्स ३० मार्च रोजी अधिसूचित केले व आयटी रिटर्न ३१ जुलैपर्यंत भरता येतील असे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी रिटर्नचे फॉर्म अधिसूचित होईपर्यंत जुलै उजाडला होता व त्यानंतर रिटर्नस्चे ई-फायलिंग सुरू झाले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
प्राप्तिकर विभागाचा ‘टॅक्स कॅल्क्युलेटर’
By admin | Published: April 04, 2016 3:19 AM