बंगळुरू - कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि काँग्रेसचे माजी खासदार आर. एल. जलप्पा यांचे चिरंजीव जे. राजेंद्र यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घातल्या आहेत. आयकर विभागाच्या 300 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी धाडी घातल्या आहे. या धाडीत तब्बल 4.52 कोटी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार, राजेंद्र हे आर. एल. जलाप्पा इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी चालवतात. नीट परिक्षांशी संबंधीत कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याच्या संशयावरून परमेश्वर आणि इतर ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा बनावट विद्यार्थी बनून दिलेल्या काही विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राजस्थानातही झडत्या घेण्यात आल्या आहेत. धाडी का घातल्या गेल्या हे मला समजले नाही अशी प्रतिक्रिया परमेश्वर यांनी दिली आहे.
परमेश्वर यांचे कुटुंब सिद्धार्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चालवतात. या संस्था परमेश्वर यांचे वडिला गंगाधरैया यांनी 58 वर्षांपूर्वी स्थापन केल्या होत्या. परमेश्वर यांचे कार्यालय, निवासस्थान आणि संस्थांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे बंधू जी. शिवप्रसाद आणि वैयक्तिक सहायक रमेश यांच्या निवासस्थानाची झडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटकातील तुमकरू शहरात ट्रस्टच्या वतीने चालवल्या जात असलेल्या दोन वैद्यकीय माहाविद्यालयांनी नीट परीक्षा घेण्यात केलेल्या अनियमिततांच्या चौकशीचा या धाडी एक भाग आहे. आतापर्यंत टाकलेल्या धाडीत तब्बल 4.52 कोटी रक्कम जप्त करण्यात आली आहे. परमेश्वर हे श्री सिद्धार्थ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. नीट परिक्षांत बनावट परिक्षार्थी बसवणे आणि जागा सुरक्षित राहाव्या यासाठी बेकायदा पैसे देण्याचा व्यवहार हा कारवाईमागे आहे.
गुरुवारी (10 ऑक्टोबर) 30 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या कार्यालयांसह काही ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या जवळपास 80 तुकड्या व पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग आहे. या तुकड्या कर्नाटक आणि राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत आहेत.